State Nursing Admission 2026: राज्यात नर्सिंगच्या 2,050 नव्या जागा, 10 सरकारी महाविद्यालये सुरू होणार

मित्रांनो राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि प्रशिक्षित परिचारिकांची वाढती गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून राज्यभरात नर्सिंग शिक्षणाचा विस्तार करण्यात येणार असून एकूण 2,050 नवीन प्रवेश क्षमता उपलब्ध होणार आहे. यामध्ये 10 नवीन सरकारी नर्सिंग महाविद्यालयांची स्थापना, विद्यमान महाविद्यालयांतील प्रवेश क्षमता वाढविणे तसेच काही जीएनएम (GNM) शाळांचे पदवी महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्याचा समावेश आहे.

राज्यात सध्या प्रशिक्षित परिचारिकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यात सुमारे 2 लाख 27 हजार परिचारिका कार्यरत असल्या तरी आरोग्य सेवेत आवश्यक मनुष्यबळाच्या तुलनेत सुमारे 64 टक्के कमतरता आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित नर्सची मागणी सातत्याने वाढत असल्यामुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, जालना, धाराशिव, गडचिरोली, पालघर, वाशीम आदी जिल्ह्यांमध्ये नवीन सरकारी नर्सिंग महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. या 10 महाविद्यालयांमुळे सुमारे 1,000 नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होईल.

याशिवाय राज्यातील 5 सरकारी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश क्षमता 50 वरून 100 विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आणखी 250 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. तसेच 16 पदवी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये 530 अतिरिक्त जागा निर्माण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारने 8 जीएनएम (General Nursing and Midwifery) शाळांचे बी.एससी. नर्सिंग महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्याचाही निर्णय घेतला आहे. या रूपांतरणामुळे सुमारे 800 नवीन जागा उपलब्ध होतील. त्यामुळे नर्सिंग शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाची संधीही वाढणार आहे.

आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे बारावी (PCB) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याचे नवीन मार्ग खुले होणार आहेत. सरकारी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या संधी वाढल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण कमी खर्चात उपलब्ध होईल. त्याचबरोबर भविष्यात राज्यातील रुग्णालयांना प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *