मित्रांनो महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पाठ्यपुस्तकांबाबत महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करताना काही इयत्तांची पुस्तके पूर्णपणे बदलली जाणार आहेत, तर काही इयत्तांसाठी हे जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष ठरणार आहे.
नवीन अभ्यासक्रम कोणत्या इयत्तांना?
बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२६ पासून खालील इयत्तांना नवीन पाठ्यपुस्तके लागू होतील:
- इयत्ता 2 री, 3 री, 4 थी आणि 6 वी.
- या इयत्तांच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आला असून, पालकांनी जुनी पुस्तके न वापरता नवीन आवृत्तीचीच पुस्तके खरेदी करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
‘या’ इयत्तांसाठी शेवटची संधी
खालील इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे हे शेवटचे वर्ष असेल,
- इयत्ता 5 वी, 7 वी, 9 वी आणि 11 वी.
- या इयत्तांचा अभ्यासक्रम या वर्षी बदललेला नाही, मात्र 2027-28 च्या वर्षात तो बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षी पालकांनी ही पुस्तके आवश्यकतेनुसारच खरेदी करावीत.
मराठी भाषा आता अनिवार्य
भाषेच्या बाबतीत बालभारतीने कडक धोरण अवलंबले आहे. इंग्रजी माध्यमाच्या 2 री, 3 री, 4 थी आणि 6 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिकू मराठी आनंदे’ हे पुस्तक अनिवार्य असेल. तसेच इतर माध्यमांच्या (हिंदी, उर्दू, गुजराती इ.) विद्यार्थ्यांसाठी ‘करू मैत्री मराठीशी’ ही पाठ्यपुस्तके बंधनकारक करण्यात आली आहेत.
खासगी प्रकाशकांच्या ‘जर्नल’ला चाप
इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने स्वतःची प्रात्यक्षिक नोंदवही (Practical Notebook) तयार केली आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांना खासगी प्रकाशकांची महागडी जर्नल्स घेण्यास सक्ती करतात, मात्र आता बालभारतीचीच नोंदवही वापरणे बंधनकारक राहील. कोणत्याही शैक्षणिक संस्थेला खासगी प्रकाशकाच्या वहीसाठी विद्यार्थ्यांवर सक्ती करता येणार नाही.
विद्यार्थ्यांसाठी खास सवलत
विद्यार्थ्यांचा सराव व्हावा यासाठी बालभारतीने 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वाध्यायपुस्तिका तयार केल्या आहेत. या पुस्तिकांच्या मूळ किमतीवर 40 टक्के सवलत दिली जाणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.



