मित्रांनो राज्यातील कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी वर्षीय एलएलबी (Five Year LLB) अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2026 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 9 जुलै 2026 होती.
5 वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 19 जून 2026 पासून सुरू झाली होती. मात्र, प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अर्ज करणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याने CET Cell ने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत 19,123 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे, तर प्रवेश परीक्षेला 21,288 विद्यार्थी बसले होते. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांनी पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रे निश्चित आकारात JPG, JPEG किंवा PDF स्वरूपात स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. कागदपत्रांच्या आकार आणि स्वरूपाबाबतची सविस्तर माहिती CET Cell च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यावर्षी 5 Year LLB CET 2026 परीक्षा 8 मे 2026 रोजी घेण्यात आली होती आणि तिचा निकाल 16 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आला. निकालानंतर आता केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू असून, पात्र विद्यार्थ्यांनी 17 जुलै 2026 पूर्वी ऑनलाइन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाण्याची शक्यता कमी असल्याने इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन CET Cell कडून करण्यात आले आहे.



