School Dropout Report: नववी-दहावीत विद्यार्थ्यांची गळती सर्वाधिक; शिक्षण व्यवस्थेसमोर नवे आव्हान

मित्रांनो भारतात शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात असल्या तरी माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांची गळती ही गंभीर समस्या बनली आहे. UDISE+ (Unified District Information System for Education Plus) अहवालानुसार इयत्ता 9वी आणि दहावीमध्ये विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामागे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची अपुरी संख्या, ग्रामीण भागातील शाळांचे जास्त अंतर, वाहतुकीच्या मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि कुटुंबीय जबाबदाऱ्या ही प्रमुख कारणे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अहवालानुसार प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांची गळती कमी असली तरी माध्यमिक शिक्षणात ती लक्षणीयरीत्या वाढते. विद्यार्थ्यांना शिक्षणात टिकवून ठेवण्यासाठी नवीन माध्यमिक शाळा सुरू करणे, शिक्षकांची उपलब्धता वाढवणे, सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शिष्यवृत्ती व इतर शैक्षणिक योजनांचा प्रभावी विस्तार करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

देशातील गळतीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास इयत्ता 1 ते 5 मध्ये गळतीचे प्रमाण केवळ 0.3 टक्के, 6 ते 8 मध्ये 3.6 टक्के, तर 9 ते 10 मध्ये 9.5 टक्के इतके आहे. नववी-दहावीमध्ये मुलांचे गळतीचे प्रमाण 10.9 टक्के, तर मुलींचे 8 टक्के आहे. शिक्षणाचा हक्क (RTE) कायद्यामुळे प्राथमिक शाळांची संख्या वाढली असली तरी त्याच प्रमाणात माध्यमिक शाळा उभारल्या गेल्या नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दूरच्या शाळांमध्ये जावे लागते आणि काही विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतात. ही समस्या दूर करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, ग्रामीण भागात अधिक माध्यमिक शाळा सुरू करणे आणि विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे UDISE+ अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *