MPSC उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ऑनलाइन पूर्व परीक्षेबाबत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर स्पष्टीकरण दिले आहे. ऑनलाइन परीक्षा कोणत्याही खासगी संस्थेकडून घेतली जाणार नसून, खासगी कंपनीची भूमिका केवळ तांत्रिक सेवा (Technology Partner) पुरवण्यापुरतीच मर्यादित असेल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाच्या माहितीनुसार, फक्त पूर्व परीक्षा (Prelims) संगणकाधारित (Computer-Based Test) पद्धतीने घेतली जाईल, तर मुख्य परीक्षा (Mains) पूर्वीप्रमाणेच पेन-पेपर पद्धतीने होणार आहे. परीक्षा प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची सुरक्षा, देखरेख आणि संपूर्ण नियंत्रण MPSC कडेच राहणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर शासकीय अधिकारी आणि शिक्षक पर्यवेक्षक म्हणून उपस्थित असतील.
MPSC च्या मते, सध्या भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अडीच ते तीन वर्षे लागतात. ऑनलाइन पूर्व परीक्षा सुरू केल्यास लेखी परीक्षा 6 महिन्यांत आणि संपूर्ण भरती प्रक्रिया सुमारे 10 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे उमेदवारांचा प्रतीक्षाकाळ कमी होण्याबरोबरच रिक्त सरकारी पदेही लवकर भरता येतील.
त्यामुळे सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. MPSC ने स्पष्ट केले आहे की परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे आयोगाच्या नियंत्रणाखालीच पारदर्शक आणि सुरक्षित पद्धतीने पार पडणार आहे.



